वडिलांना घराबाहेर पाठविले; सुसाईट नोट लिहून अभियंता मुलीने घेतला गळफास
नागपूर : इंजीनियरिंगमध्ये टॉपर असलेल्या तरुणीला पुण्यातच नोकरी लागली. मात्र काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. तिच्या वागण्यावरून वडिलांना स्पष्ट जाणवत होते, ती कुठल्यातरी दडपणाखाली आहे, परंतु ती टोकाचा निर्णय घेईल, असा विचारही कुणी केला नसावा. तिने वडिलांना फराळ आणायला पाठविले. वडिल घराबाहेर पडताच तिने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. वडिल फराळ घेऊन घरी परतले असता त्यांना धक्काच बसला. ही दुर्दैवी घटना मानकापूर परिसरात घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
वैशाली (२८) असे त्या युवतीचे नाव आहे. तिला वडिल, भाऊ आणि एक विवाहित बहिण आहे. वैशालीने पुण्यात इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले आणि तेथेच एका कंपनीत नोकरी करीत होती. मार्च महिण्याच्या सुरूवातीलाच ती घरी परतली. तेव्हापासून घरीच राहायची. मात्र, तिच्या वागण्यावरून ती कुठल्यातरी दडपणात असावी, असे कुटुंबीयांच्या लक्षात आले. ती प्रचंड चिडचिड करायची. मागील आठ दिवसांपासून तिचे जेवनावरही फारसे लक्ष नव्हते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वडिलांशी बोलली. त्यांना फराळ आणायला पाठवून तिने गळफास लावला. वडिल घरी पोहोचल्यावर दार बंद होते. त्यांनी दार ठोठावले मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मागच्या दारातून ते घरात गेले असता वैशाली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी हंबरडा फोडताच शेजारीही धावले.

बहिणीला माहिती देण्याच्या उद्देशातून वैशालीने एक सुसाईट नोट लिहले. त्यात दोन युवकांची नावे आहेत. ते दोघेही सख्ख्ये भाऊ आहेत. माझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्यासाठी हे दोघे भाऊ जबाबदार असतील असे तिने नमूद केले आहे. ही संपूर्ण माहिती त्यांच्या कार्यालयीन मेल आयडीवर मिळेल. काही लोक बनावट व्हिडिओ बनवून मला फसवित आहेत तसेच रुमपार्टनर मैत्रीणीने धमकी दिल्याचाही उल्लेख केला आहे. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


