4 हजार रुपयांसाठी युवकाचे अपहरण करत धारदार शस्त्राने खून; कुही तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील घटना

4 हजार रुपयांसाठी युवकाचे अपहरण करत धारदार शस्त्राने खून; कुही तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील घटना

कुही:- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील डोंगरगाव शिवारात जुन्या पैश्याच्या वादातून तरुणाचे अपहरण करून नंतर धारधार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका विधिसंघर्ष ग्रस्त बालकाचा समावेश आहे.

महेश विनोद खंडाळे (वय-18) रा.स्वीपर कॉलनी, दहीबाजार, नागपूर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. फिर्यादी युवराज टेकाम याने दिलेल्या माहितीनुसार महेश हा गाडीवर चालकाचे काम करायचा. दि.12 मार्च रोजी होळीच्या सणा निमित्य कुही तालुक्यातील मांगली गावात आजी ताराबाई हिच्याकडे आला होता. दरम्यान फिर्यादी युवराज टेकाम हे (दि.13मार्च) सुरगाव येथे भिशीचे जमा पैसे उचल करण्यासाठी आले होते. मात्र ज्याच्याकडे पैसे जमा होते तो हजर नसल्याने ते दुचाकीने नवरगाव जायला निघाले. दरम्यान सुरगाव येथून काही अंतर दूर गेल्यावर युवराज टेकाम यांच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने त्यांच्या ओळखीतील महेश खंडाळे याला त्यांनी बोलावून घेतले. महेश हा मांगली येथील प्रदीप रंगारी नामक युवकाच्या दुचाकीने आला. व प्रदीप याच्या गाडीतील पेट्रोल काढून टेकाम यांच्या गाडीत टाकून तिथून आपल्या आपल्या वाहनाने निघून गेले.

दरम्यान टेकाम हे नवरगाव येथे थांबले असता प्रदीप रंगारी हा दुचाकीने एकटाच परत आला. व त्याने सांगितले की डोंगरगाव येथील रोशन दांडेकर, कुणाल काकडे व इतर 1 यांनी गाडी थांबवून महेश याला रोशन दांडेकर याने 2-3 थापड मारून तू माझे पैसे का देत नाही. आज माझे पैसे दिले नाही तर तुला मुर्दा पाडतो असे म्हणून महेश याला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवून कुहीचा दिशेने घेऊन गेल्याचे सांगितले. टेकाम यांनी महेश याला कॉल केला असता कॉल लागला नाही व लगेच टेकाम यांच्या फोन वर महेश याचा कॉल आला. व त्याने सांगितले की, तू माझ्या आई बाबाला घेऊन ये नाहीतर त्यांच्याकडून पैशे घेऊन ये नाहीतर हे मला सोडणार नाही. टेकाम यांनी लगेच महेशचे वडील विनोद खंडाळे यांना कॉल करत विहिरगाव पुलाजवळ भेटत घडलेला प्रकार सांगितला. व दोघेही डोंगरगाव येथे येऊन रोशन दांडेकर यांच्या घरी गेले असता रोशन हा घरी मिळून आला नाही. त्याला कॉलही केला मात्र त्याने कॉल उचलला नाही. त्यानंतर महेश याचा फोनवर कॉल केला असता महेश याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे घाबरलेल्या टेकाम व महेशचे वडील विनोद खंडाळे हे पाचगाव येथील पोलीस चौकीत आले. व घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. लागलीच पोलिसांनी रोशन दांडेकर याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तो मिळून न आल्याने त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उचलत नसल्याने पोलिसांनी त्याचा मोबाईलचे लोकेशन काढले. त्यात त्याचे लोकेशन मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कढोली येथे दाखवल्याने पोलिसांनी त्याचा कढोली येथे शोध घेतला मात्र तेथेही तो मिळून न आल्याने आजूबाजूच्या परिसरातील मौजा महालगाव, खेडी, परसोडी, आडका, टेमसना, दिघोरी(काळे), तितुर, बहादुरा आदी ठिकाणी जाऊन शोध घेतला असता मिळून आले नाही. परत चौकीत आले व रोशन दांडेकर याचे सोबत असलेल्या कुणाल काकडे व इतर एक याचा शोध घेण्याचे ठरवले. त्या नंतर काही वेळाने कुणाल काकडे हा चौकी समोरूनच नागपूरच्या दिशेने जात असल्याचे कळाल्याने पोलीस दिलीप लांजेवार, आशिष खराबे व प्रवीण वाट यांनी त्यांचा पाठलाग करत त्याला पाचगाव पोलीस चौकी येथे आणून विचारपूस केली असता त्यांनी रोशन दांडेकर सह मिळून महेश खंडाळे याचा डोंगरगाव शिवारात खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता महेश खंडाळे खून झालेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी फिर्यादी युवराज टेकाम यांचे तक्रारीवरून आरोपी रोशन कैलास दांडेकर (वय32), कुणाल रमेश काकडे (वय25) व एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन या करत आहेत.

* फिर्यादी युवराज टेकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महेश खंडाळे हा 1 वर्षांपूर्वी आरोपी रोशन दांडेकर याच्या 10 चाकी ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. त्यावेळी गाडीत माल टाकण्यासाठी रोशन दांडेकर याने दिलेले 20 हजार रुपये महेश याच्या हातून हरविल्याने तो हरविलेले पैसे परत करणार होता. हरविलेल्या 20 हजार पैकी महेश याने 16 हजार परत केले होते. व उर्वरित 4 हजार रुपये देणे बाकी होते. त्याच पैश्याच्या कारणावरून आरोपीनी महेश याचे अपहरण करत डोंगरगाव शिवारातील एका शेतात धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर व पाठीवर घाव मारून त्याचा खून केला.