घोडाझरी तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; पाण्यात बुडून पाच तरुणांचा मृत्यू
नागभीड: तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे व तेजस ठाकरे या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी येथील रहिवासी असलेली ही सर्व मुले धुलीवंदनानंतर शनिवारची सुटी घालवण्यासाठी नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे आली होती. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घोडाझरी तलावातून तळोधी बाळापूर पाणी पुरवठा योजनेची टाकी असलेल्या परिसरात ही सर्व मुले पोहत होती. अशातच ही दुर्देवी दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही मृत साधारणत: २० ते २५ वयोगटातील आहेत. एकूण सहा जण पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील एक जण बचावला.

घटनेसंदर्भात तहसीलदार व ठाणेदार यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी घटनस्थळाकडे धाव घेतली. बचाव पथकाला देखील पाचारण करण्यात आले. घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीयांना सोपवले जाणार आहे. एकाच कुटुंबातील चार भावांचा बुडून मृत्यू झाल्याने गावंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


