जीबीएसने वाढवली नागपूरकरांची चिंता ! शहरात तिसरा बळी
नागपूर: गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात एक लहान मूल आणि दोन प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. या वर्षातील जीबीएसमुळे मेडिकलमधील हा तिसरा मृत्यू आहे.

नागपुरात ‘जीबीएस’चा आठवड्यातून जवळपास एक रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी मृत्यू झालेला रुग्ण 32 वर्षीय पुरुष होता. नागपुरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी अत्यंत गंभीर स्थितीत या रुग्णाला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णाला आणखीही इतरही आजर होते.
शासकीय वैद्यकीय महाविदयालय आणि रुग्णालयाचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले “या रुग्णाचा मृत्यू केवळ ‘जीबीएस’मुळे झाला असे म्हणता येणार नाही. कारण, ‘कोमोरबिडिटी’ म्हणजे इतरही गंभीर आजार रुग्णाला होते. विशेष म्हणजे, त्याला फायब्रोसिस, अल्कोहोलिक हिपॅटायटिस, स्वादुपिंडाचा तीव्र दाह, एन्सेफॅलोपॅथीसह सेप्सिस होता.”


