नरभक्षी वाघाने घेतला शेतकऱ्याचा नरडीचा घोट

नरभक्षी वाघाने घेतला शेतकऱ्याचा नरडीचा घोट

पारशिवनी : पारशिवनी वनपरिक्षेत्रातील कोंडा सावळी या गावातील दशरथजी धोटे या शेतकऱ्याचा, शेतातून गावाकडे येत असताना नरभक्षी वाघाने अचानक हल्ला करून नरडीचा घोट घेत आपल्या पोटाची खळगी भरली.

पारशिवनी तालुक्यातील ४८ गावांमध्ये पट्टेदार वाघाने आपली दहशत कायम ठेवली आहे. १२ जानेवारी ला शेतात तुर कापणी करत असताना आमगाव येथील सहदेव सुर्यवंशी या शेतमजूराच्या नरभक्षी वाघाने अमानुषपणे ठार केले होते. तर पेठ परसोडी येथील शेतकरी चंद्रशेखर इंगळे यांच्या वर हल्ला करून जखमी केले होते.

या घटनेनंतर आता पारशिवनी वनपरिक्षेत्रातील कोंडा सावळी येथील शेतकरी दशरथजी धोटे हे आवळेघाट येथे आपल्या शेतात गेले पण मुलाने त्यांना घरी जाऊन आराम करा असे सांगितले. दशरथजी ढोरे हे घरी जाण्यासाठी निघाले पण रस्त्यात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला, ते ओरडले असता जवळ असलेल्या शेतातील मुलगा धावत आला समोरील दृश्य पाहून त्यांने सुध्दा मदतीसाठी ओरडून मदत मागितली. पण नरभक्षी वाघाने मुलांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या वडिलांना ५० फुटा पर्यंत फरफटत नेले.

अखेर गावकरी आले

गावातील नागरिक आले असता नरभक्षी वाघाने जागा सोडली व गावातील नागरिक यांनी तातडीने पारशिवनी पोलीस व वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना घटनेची माहिती दिली. नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण नरभक्षी वाघाला पकडण्यास अपयश आले. आमगाव शिवारात दोन म्हैस बांधून नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला पण वाघाने एक म्हैस फस्त करून वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.