तब्बल दोन वर्षांनी केला चोरीचा पर्दाफाश ; कुही येथील शिक्षक दाम्पत्याच्या घरी झाली होती चोरी

तब्बल  दोन वर्षांनी केला चोरीचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेची तपासाला यश 

कुही :– कुही शहरातील तब्बल दोन वर्षांपूर्वी एका शिक्षक दाम्पत्याच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल ताब्यात घेत आरोपींना अटक केली आहे.

गोवर्धन तिजारे, रा. वार्ड क्र.१५ कुही यांच्या फिर्यादीवरून १७ सप्टेंबर २०२२ रोजी कुही पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिजारे यांच्या घरून सकाळी ८ ते दुपारी १२ च्या सुमारास घरी केवळ वृद्ध आजीबाई असल्याने हेरून अज्ञात चोरांनी घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. बरेच दिवस शोध घेऊनही चोरांचा  सुगावा लागला नाही.  मात्र या गुन्ह्याचा समांतर स्थानिक गुन्हे शाखा ,नागपूर ग्रामीण येथे सुरु असताना विश्वसनीय मुखबिराद्वारे माहिती मिळाली कि  दीड ते दोन वर्षापूर्वी गोवर्धन तिजारे यांच्या घरी झालेली चोरी कुही येथील लोकेश किंदरले व त्याच्या मित्र सचिन देशमुख यांनी केली असून सोन्याचे दागिने नागपूर येथे विकले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले. व चोरी केलेले सोने हे नागपूरातील  हिवरी नगर येथील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे विकल्याचे सांगितले.  पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी  केली असता नमूद दोन्ही आरोपी यांनी एक सोन्याचा मंगळसूत्र  , सोन्याची चैन विकली असून सुवर्णकारला खरेदी केलेला  माल चोरीचा  असल्याचे माहित नसल्याने त्याने खरेदी केलेला मुद्देमाल गाळून त्याची एक ३८ ग्रामची लग्गड तयार केली होती. पोलिसांनी पंचासमक्ष लग्गड जप्त केली. तर इतर चोरी गेलेले सोन्याची पोत व टोप्स बाबत विचारणा केली असता आरोपी लोकेश किंदारले याने त्याचा घरी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष सोन्याची पोत ५ ग्राम व कानातील टोप्स ८ ग्राम ९६० मिलीग्राम जप्त केले आहे. पोलिसांनी लोकेश अशोक किंदारले व सचिन रामाजी देशमुख दोघेही रा. गावतलाव जवळ वार्ड क्र. १६ यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील गोपाले करीत आहेत.