नागपूर: इंस्टाग्राम फ्रेंडसोबत पळालेली अल्पवयीन मुलगी अडीच वर्षांनंतर बाळासह सापडली

नागपूर: इंस्टाग्राम फ्रेंडसोबत पळालेली अल्पवयीन मुलगी अडीच वर्षांनंतर बाळासह सापडली

नागपूर : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि युवक लवकरच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मुलीच्या घरच्यांना याची चुणूक लागताच दोघांनी पळ काढत प्रेमविवाह केला. अडीच वर्षांनी त्यांचा सुगावा लागला आणि पोलिसांनी त्यांना शहरात परत आणले. मात्र, पळून गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीसोबत तिचे ५ महिन्यांचे बाळ देखील सोबत होते.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी १६ वर्षीय सोनाली (बदललेले नाव) हिची इन्स्टाग्रामवर चंद्रपूर येथील एका २२ वर्षीय युवकाशी ओळख झाली. एकमेकांशी बोलताना ते अधिक जवळ आले आणि दोघेही सोबत आयुष्य घालविण्याची स्वप्ने बघत होते. तसे असले तरी वय लग्नाचे नसल्याचे दोघांनाही भान होते.

सोनालीच्या घरच्यांना प्रेमप्रकरण माहिती पडले. सोनाली हिला लहान भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडील हाताला मिळेल ती कामे करतात. प्रेमप्रकरणावरून घरच्यांनी तिची समजूत काढली. परंतु, सोनालीचा निर्णय ठाम असल्याने तिने न सांगता घरातून पळ काढला. ती थेट चंद्रपूरला गेली आणि प्रियकराला भेटली. येथून दोघांनी थेट पुणे गाठले. पुण्यात प्रियकराने काम शोधले आणि दोघेही भाड्याने राहू लागले. सोनाली १८ वर्षांची झाल्यानंतरच त्यांनी लग्न केले. प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न मान्य केल्यानंतर ते चंद्रपूरला सोबत राहू लागले. तर तिचा पती हा कामानिमित्ताने पुण्यात ये-जा करायचा.

इकडे मुलगी सापडत नसल्याने सोनालीच्या घरचे पोलिसांकडे सतत विचारपूस करत होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला सोनालीचे लोकेशन सापडले आणि त्यांनी थेट चंद्रपूर गाठले. यावेळी तिचा पती पुण्याला होता. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या ५ महिन्याचा बाळाला नागपूरला आणले आणि घरच्यांची भेट घडवून आणली.