वाघाच्या बछड्याशी दोन हात करत शेतकऱ्याने वाचवला स्वतःचा जीव

वाघाच्या बछड्याशी दोन हात करत शेतकऱ्याने वाचवला स्वतःचा जीव

चंद्रपूर : सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला. बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याने पळ काढला. शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमध्ये शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी झाले असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी येथील ४२ वर्षीय गोवर्धन डांगे गावापासून जवळ असलेल्या स्वतःचे शेतामध्ये सकाळी सव्वासात वाजता गेले होते. शेतासभोवती दूरवर जंगल नाही. तरीही अचानक एक वाघाचा बछडा शेतात येऊन धडकला. काम करीत असलेल्या डांगे यांच्या समोर तो अचानक पुढे येत, बछड्याने क्षणाचाही विलंब न करता थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.  तेवढ्याच तत्परतेने बछड्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी प्रतिकार करत हल्ला परतावून लावला. त्यामुळे बछड्याला पळून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही. तो पळून गेला, मात्र यामध्ये शेतकरी जखमी झाले. पुन्हा बछडा परतून येईल त्यामुळे भयभीत झालेले शेतकरी लगतच्या विहिरीत उतरले व तेथूनच त्यांनी मुलाला फोनवरून माहिती दिली.

मुलगा आणि गावातील नागरिक शेत शिवारात दाखल झाले. वडील रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबियांना आणि नागरिकांना सांगितली. त्यानंतर त्यांना लगेच ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.