चोरीचा संशयातून ट्रकचालकाला बेदम मारहाण ; ट्रान्सपोर्टरसह एक अटकेत
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत ट्रान्सपोर्ट व्यवसायिक व त्याच्या साथीदाराने चोरीच्या संशयावरून ट्रकचालकाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोस्टमार्टम अहवालात मारहाणीचा उल्लेख आल्याने पोलिसांनी आता दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. संजू मोहने (वय ३८) असे मृतकाचे नाव आहे.
आरोपी राजेश शेषनाथ उपाध्याय (वय ४५, रा. लोकमान्य नगर) याचा खरबी परिसरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. हिंगणा रोडवरील बंसीनगर येथे त्याचे गोदाम व वाहनतळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील संजू मोहने हा त्याच्याकडे ट्रक चालक म्हणून कार्यरत होता. संजयला दारूचे व्यसन होते. आणि त्यासाठी तो वेळोवेळी चोरी करत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी ट्रान्सपोर्टर राजेशच्या ट्रकमधून बॅटरी, जैक व इतर साहित्य चोरीस गेले होते. याचा संशय संजयवर घेत राजेशने आपल्या ओळखीचा रूपेश भूरे (रा. पारडी) याच्या मदतीने संजूला मारहाण केली. या मारहाणीनंतर संजू हिंगणा रोडवरील रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात संजयच्या शरीरावर झालेल्या मारहाणीच्या खुना आणि झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०४(सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी राजेश उपाध्याय आणि रूपेश भूरे या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

